लोणार (गावकरी टाइम्स/ फिरदोस खान पठाण)
शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यात लोणार नगरपालिका सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर येत असून, पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना नाहक हाल सोसावे लागत आहेत. शहरातील वार्ड क्रमांक २, आझाद नगर भागात पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत असून, संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या नरकयातनांमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
आझाद नगर भागात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पक्की गटार अथवा नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे घराघरांतील सांडपाणी रस्त्यावर साचून डबकी तयार झाली आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
लहान मुले, महिला आणि वृद्धांचे हाल
रस्त्यावर सर्वत्र सांडपाणी आणि चिखल साचल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या घाणीतूनच वाट काढत जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील घसरड्या घाणीमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींचे सोयीस्कर दुर्लक्ष?
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रभागाचे स्थानिक नगरसेवक व नगरसेविका या गंभीर समस्येकडे ढुंकूनही पाहत नसल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. "निवडणुका आल्या की हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी समस्यांच्या वेळी गायब का होतात?" असा संतप्त सवाल आझाद नगरवासीयांकडून विचारला जात आहे.
आंदोलनाचा इशारा
वारंवार विनंती करूनही पालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधील रोष शिगेला पोहोचला आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आझाद नगरमध्ये कायमस्वरूपी पक्क्या नाल्यांची व्यवस्था करावी, अन्यथा पालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक संतप्त नागरिकांनी दिला आहे.

0 Comments