सुलतानपूर मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या चोरीचे थरारनाट्य; ट्रॅफिकमध्ये मंडळ अधिकाऱ्यांना लुटले, पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू



सुलतानपूर(गावकरी टाइम्स/मोईन खान):
नेहमी वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या सुलतानपूर शहरात आज भरदिवसा एका धाडसी चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक कोंडीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीतून रोख ५० हजार रुपये, शासकीय कागदपत्रे आणि लॅपटॉप असलेली बॅग क्षणात लंपास केली.


मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी लक्ष्मण नारायण सानप यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने ते मेहकरवरून लोणारकडे स्वतःच्या चार चाकी गाडीने जात होते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन सुलतानपूर शहरात पोहोचले असता रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. सानप यांचे वाहन ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना, गर्दीचा फायदा उठवत एका अज्ञात भामट्याने गाडीत ठेवलेली बॅग अत्यंत चालाखीने लंपास केली. या बॅगेमध्ये ५० हजार रुपयांची रोख रक्कम, कार्यालयाचा लॅपटॉप आणि अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय कागदपत्रे (फाईल्स) होती. ट्रॅफिक सुरळीत झाल्यानंतर काही वेळाने गाडीतील बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच सुलतानपूर बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार तसेच एपीआय अवचार साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या मदतीने फरार आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.

(टीप: ही बातमी प्राथमिक माहितीच्या आधारे असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध होताच यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.)
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments