साखरखेर्डा / मेहकर(गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी):
सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सुखी संसाराची राखरांगोळी झाल्याची एक धक्कादायक घटना साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. तब्बल १२ वर्षांचा संसार आणि दोन लहान मुले असतानाही एका विवाहीत महिलेने इन्स्टाग्रामवर जुळलेल्या ३० वर्षीय प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरत पती व घरादाराला सोडचिठ्ठी दिली. नातेवाईक आणि पोलिसांनी हात जोडून विनवणी करूनही महिलेने आपला निर्णय न बदलल्याने अखेर कुटुंबीयांना मान खाली घालावी लागली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला असून तिला १० वर्षांचा आणि ४ ते ५ वर्षांचा अशी दोन मुले आहेत. यादरम्यान तिची लांबच्या नात्यातील एका ३० वर्षीय युवकाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पतीच्या तक्रारीनंतर २ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा पोलिसांनी दोघांनाही एका गावातून ताब्यात घेतले व ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच महिलेचे पती, काका, चुलत भाऊ यांच्यासह गावातील अनेक नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने तिची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र "माझे खरे प्रेम त्याच्यावरच आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही," असा ठाम पवित्रा तिने पोलिसांसमोर घेतला.
लहान मुलांचे भविष्य अंधारात
महिलेचे माहेर व प्रियकराचे गाव साखरखेर्डा ठाण्याच्या हद्दीत येत असले, तरी पुढील कायदेशीर बाबींसाठी साखरखेर्डा पोलिसांनी दोघांना मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जाताना महिलेने चार वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेतले असून, प्रियकराच्याच वाहनात बसून जाण्याचा हट्ट धरला. तर १० वर्षांचा मोठा मुलगा मागे राहिला आहे. या घटनेमुळे दोन्ही निष्पाप मुलांचे भविष्य टांगणीला लागले असून, आईच्या या निर्णयामुळे परिसरातून तीव्र हळहळ व संताप व्यक्त होत आहे. सध्या साखरखेर्डा व मेहकर परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

0 Comments