लोणार पोलिसांचा मोठा धमाका! अश्लील व्हिडिओ पसरवणाऱ्या 'खळेगावच्या तरुणाला केली अटक.

लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांची बदनामी करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लोणार पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. एका २१ वर्षीय तरुणाने महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती, मात्र सायबर सेलच्या मदतीने लोणार पोलिसांनी तांत्रिक तपास चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी (ता.लोणार) येथील एका पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. आरोपीने या महिलेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते फक्त तिलाच नाही, तर गावातील इतर महिलांनाही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. इतकेच नाही तर स्वतःची ओळख लपवून तो महिलांना नग्न व्हिडिओ कॉल देखील करत असे. या गंभीर प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

असा लागला छडा

बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) श्री. संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.
 तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रवि गजानन वायाळ (वय २१, रा. खळेगाव, ता. लोणार) याला निष्पन्न करून ८ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेला २०,५०० रुपये किमतीचा 'One Plus' कंपनीचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

या कारवाईत पो.नि. प्रकाश सदगीर, पोकाँ गणेश लोढे, अनिल शिंदे यांनी मोलाची कामगिरी केली, तर सायबर सेलचे राजू आडवे आणि पवन मखमले यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.
"महिलांनी अशा सायबर गुन्हेगारांना न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, जेणेकरून अशा नराधमांना वेळीच अटकाव करता येईल," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments