बुलढाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजत होते, पाहुणे-रावळ्यांची लगबग होती आणि काही तासांतच मुलाच्या डोक्यावर अक्षता पडणार होत्या, त्याच घरावर नियतीने असा काही घाला घातला की आनंदाचं रूपांतर एका क्षणात आक्रोशात झालं. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते नांदुरा मार्गावरील कोळसर फाट्याजवळ आज सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पंढरी त्र्यंबक बगाडे हे आपल्या कामासाठी निघाले असता, एका सुसाट दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पंढरी बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला.
विचित्र योगायोग आणि काळाचा घाला
या घटनेतील सर्वात दुःखद बाब म्हणजे, आज पंढरी बगाडे यांच्या मुलाचे लग्न होते, तर उद्याच त्यांच्या मुलीचेही लग्न होणार होते. दोन-दोन लग्नकार्यांच्या तयारीत असलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात आनंदाचे वातावरण असतानाच पित्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा 'गावकरी टाइम्स'.


0 Comments