काम पूर्ण, पण पाणी कधी? वेणी येथे जलजीवन मिशनच्या पाण्यासाठी उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; पाणी मिळेपर्यंत मागे न हटण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार



वेणी (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
लोणार तालुक्यातील मौजे वेणी येथे ‘जलजीवन मिशन’ योजनेचे काम पूर्ण होऊनही प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय दिरंगाई व ठेकेदाराच्या टाळाटाळीविरोधात राजकुमार सदाशिव दळवे आणि रामकिसन नारायण दहिभाते यांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.  


यापूर्वी जून २०२६ मध्ये ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले असता, संबंधित कंत्राटदाराने ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते व उपविभागीय अभियंत्यांनी तसे लेखी पत्रही दिले होते. मात्र महिने उलटूनही प्रत्यक्षात नळाला पाणी न आल्याने अखेर ग्रामस्थांना पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.  

आंदोलनाची तीव्रता वाढत असून विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये आशिष रहाटे, नीरज रायमुलकर, नंदू मापारी यांनी भेट दिली, तर आज सिद्धार्थ खरात यांनी उपोषण मंडपास भेट देऊन प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि उपोषणकर्त्यांच्या  मागण्यांना पाठिंबा दिला.

गावातील पाणीटंचाई लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून पाणी योजना कार्यान्वित करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments