मेहकर: (गावकरी टाइम्स)शहरालगतच्या बायपास चौफुलीवर रविवारी सायंकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला असून, यामध्ये एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. वेगात आलेल्या आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार माजी सैनिक अच्युतराव शिरसाट (रा. वडगाव तेजन, ता. लोणार) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास अच्युतराव शिरसाट हे आपल्या दुचाकीने मेहकरहून वडगाव तेजन गावाकडे जात होते. कॉटन मार्केटवरून सुलतानपूरकडे जाणाऱ्या बायपास चौफुलीवर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शिरसाट यांचा जागीच अंत झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुग्णवाहिका ताटकळली, नागरिकांचा उद्रेक
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, कॉल करूनही जवळपास तासभर उलटून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
चौफुली ठरतेय 'ब्लॅक स्पॉट'
हा बायपास रस्ता चोवीस तास वाहतुकीने गजबजलेला असतो. तरीही या महत्त्वाच्या चौफुलीवर वाहनांचा वेग रोखण्यासाठी गतिरोधक नाहीत आणि रात्रीच्या वेळी पुरेशा पथदिव्यांचीही व्यवस्था नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच या चौफुलीवर वारंवार जीवघेणे अपघात घडत असल्याचा आरोप करत, येथे तातडीने गतिरोधक व पथदिवे बसवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

0 Comments