दाभा (गावकरी टाइम्स/किशोर मोरे):
लोणार तालुक्यातील पहूर येथील पाझर तलावातून सुरू असलेल्या बेसुमार अवैध पाणी उपशाविरोधात अखेर प्रशासकीय यंत्रणा हलली आहे. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच मंडळ अधिकारी विष्णू केंद्रे यांनी घटनास्थळी अचानक धडक देत पाहणी केली. या कारवाईदरम्यान तलाव परिसरात पाण्याच्या अनेक मोटारी व विजेच्या केबलचे जाळे उघडकीस आले. याप्रकरणी तलाठी सिद्धभट्टी यांनी पहूरचे सरपंच अंकुश मुंडे यांच्या समक्ष संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
२४ सप्टेंबरची तक्रार; मग १५ दिवस प्रशासन का झोपले होते?
पहूर येथील शेतकरी प्रकाश सखाराम डाखोरे यांनी २४ सप्टेंबर रोजीच तहसील कार्यालयात लेखी तक्रार नोंदवून अवैध उपसा रोखण्याची मागणी केली होती. मात्र, तक्रार मिळूनही तब्बल दोन आठवडे प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर वाढत्या दबावानंतर केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अधिकारी पोहोचले तेव्हा उपसा बंद असल्याचे सांगत तात्काळ जप्ती न झाल्याने ठोस कारवाईबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दिवसा शुकशुकाट, रात्री पाण्याचा 'काळाबाजार'!
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दिवसा अधिकारी येत असल्याने उपसा बंद ठेवला जातो, मात्र रात्रीच्या अंधारात तलावावर मोटारींचा आवाज घुमतो. दिवसा सापडलेल्या मोटारी आणि केबल कुणाच्या मालकीच्या आहेत? त्या तलावात का टाकल्या होत्या? आणि रात्री होणाऱ्या या 'चोरी'वर कोणाचे नियंत्रण आहे? हे गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
दाभा आणि पहूरची तहान धोक्यात!
याच पाझर तलावाच्या जलसाठ्यावर दाभा गावची अधिकृत पाणीपुरवठा योजना तसेच पहूर गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पूर्णपणे अवलंबून आहेत. जर हा अनधिकृत पाणी उपसा असाच सुरू राहिला, तर भर हिवाळ्यातच दोन्ही गावांवर तीव्र पाणीटंचाईचे सावट ओढवणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या हक्कावरच गदा येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
भरारी पथक कागदावरच, कारवाई कधी?
तालुका स्तरावर अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेले भरारी पथक अद्याप एकाही ठिकाणी धडक कारवाई करू शकलेले नाही. हे पथक केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाला ग्रामस्थांचे थेट सवाल:
तलावात जप्तसदृश स्थितीत आढळलेल्या मोटारी व केबलवर तात्काळ फौजदारी कारवाई का नाही?
रात्रीच्या सुमारास होणाऱ्या उपशाला आळा घालण्यासाठी गस्त का लावली जात नाही?
दोन गावांची तहान भागवणाऱ्या जलसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी केवळ नोटिसांचा खेळ पुरेसा आहे का?
मंडळ अधिकाऱ्यांच्या पाहणीमुळे प्रकरणाची वाच्यता झाली असली, तरी हे प्रकरण केवळ कागदी नोटिसांपुरते मर्यादित राहणार की प्रत्यक्षात बेकायदेशीर यंत्रणांवर जप्तीची कुऱ्हाड चालणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाणीसाठा आज वाचवला नाही, तर उद्या दाभा आणि पहूरकरांचा घसा कोरडा पडल्याशिवाय राहणार नाही!

0 Comments