लोणार (प्रतिनिधी - फिरदोस खान पठाण):
जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कमळजा माता मंदिर यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश श्रीराम मापारी यांच्या नेतृत्वाखाली आज, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून लोणार तहसील कार्यालयासमोर ५ जणांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे.
लोणार सरोवरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मंदिरात जाण्याचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात संपूर्ण राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावतात. मात्र, रस्ता बंद असल्याने यंदा भाविक दर्शनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सरोवरातील पाणी काढून मंदिर भाविकांना सुरक्षितपणे खुले करून देण्याबाबत प्रशासनाकडे यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून अखेर हे उपोषणाचे पाऊल उचलावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.
प्रशासनाला थेट इशारा
उपोषण काळात आंदोलकांच्या जीवित्वास काही बरे-वाईट झाल्यास त्यास महसूल विभाग, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभाग हे पूर्णपणे जबाबदार राहतील, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले करण्याचा मार्ग निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
उपोषणात सहभागी नेते व पदाधिकारी
राजेश श्रीराम मापारी (माजी जि.प. सदस्य) यांच्यासोबत माजी नगरसेवक साहेबराव दशरथ पाटोळे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश समाधान वाठोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मधुकर मोरे आणि गोपी आखाडे हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा व भाविकांचा पाठिंबा मिळत आहे.

0 Comments