बिबी शिवारात मन हेलावून टाकणारी दुर्घटना;शेतात डीपीचा फ्युज दुरुस्त करताना विजेचा तीव्र धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू



बिबी (गावकरी टाइम्स/कृष्णा धाईत): शेतात पिकाला पाणी देत असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने डीपीचा फ्युज दुरुस्त करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा जोरदार झटका बसून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बिबी शिवारात घडली. ही घटना शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने गोवर्धन नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील रहिवासी गोविंद आयदान राठोड हे शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी बिबी शिवार गट नंबर ३८८ मधील आपल्या शेतात पराटीच्या (कापूस) पिकाला पाणी भरण्याचे काम करत होते. पाणी भरणे सुरू असतानाच अचानक शेतातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज का गेली हे पाहण्यासाठी गोविंद राठोड हे शेताजवळील वीज डीपीजवळ गेले. डीपीमधील फ्युज काढून तपासत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का (शॉक) बसला. विजेचा झटका एवढा भीषण होता की गोविंद राठोड हे जागीच खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृतकाचे मेव्हणे संजय टोपा राठोड (वय ४५, रा. गोवर्धन नगर, ता. लोणार) यांनी बिबी पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बिबी पोलिसांनी दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १५:४८ वाजता कलम १९४ BNSS अन्वये कायमी मर्ग नं. २७/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 माननीय ठाणेदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण (ब.नं. १७६५) हे करत आहेत. एका तरुण शेतकऱ्याचा अशा प्रकारे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाल्यामुळे गोवर्धन नगर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments