नियतीने हिरावले हसते-खेळते आयुष्य! उंबरखेड फाट्यावरील अपघातात २४ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; घुगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर


देऊळगाव राजा (गावकरी टाइम्स/इसराइल शेख):
चिखलीहून देऊळगाव राजाकडे येत असलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारचा उंबरखेड फाट्यानजीक भीषण अपघात झाला. कार अनियंत्रित होऊन थेट दुभाजकावर आदळली आणि रस्त्यावरील विद्युत खांबाला जोरात धडकली. या हृदयद्रावक अपघातात देऊळगाव राजा येथील २४ वर्षीय वैष्णवी बद्रीनाथ घुगे या तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली.


प्राथमिक माहितीनुसार, एमएच २८ बीके ८७१८ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार चिखलीकडून देऊळगाव राजाच्या दिशेने येत होती. उंबरखेड फाट्याजवळील एचपी पेट्रोल पंपाच्या परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढून नगरपालिकेच्या लोखंडी विद्युत खांबावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये पाच महिला व दोन पुरुष असे एकूण सात प्रवासी होते. अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही.
अपघातात वैष्णवी घुगे यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागला. स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ मदतकार्य राबवून जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती वैष्णवी यांना मृत घोषित केले. कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित किरकोळ जखमींवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत.
मृत वैष्णवी या देऊळगाव राजा येथील स्थानिक शिक्षक बद्रीनाथ घुगे (रा. भगवान बाबा कॉलनी) यांच्या सुपुत्री होत्या. त्या एमबीएचे उच्च शिक्षण घेत होत्या. आपल्या उज्ज्वल भविष्याची आणि करिअरची स्वप्ने रंगविणाऱ्या होतकरू वैष्णवी यांचा वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला. या घटनेने घुगे कुटुंबीयांवर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला असून, संपूर्ण देऊळगाव राजा शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वृत्त संकलित होईपर्यंत या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्याचे काम सुरू होते. अपघाताचे मूळ कारण आणि जखमींची सध्याची प्रकृती याबाबत पोलीस तपासानंतरच अधिकृत तपशील समोर येईल.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments