सुलतानपूर येथे भीषण आग; दोन दुकाने जळून खाक, अग्निशमन दलाच्या विलंबावर नागरिकांचा तीव्र संताप


सुलतानपूर ता. लोणार(गावकरी टाइम्स वृत्तसेवा):येथे आज शनिवार रोजी पहाटेच्या सुमारास आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. पहाटे अंदाजे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान अंबादास जुमडे यांच्या कपड्याच्या दुकानाला तसेच सतीश इंगळे यांच्या मोटर रिवाइंडिंगच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले आणि दुकानांमधील सर्व साहित्य व माल जळून पूर्णपणे खाक झाला. या घटनेत दोन्ही व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे निदर्शनास येताच पहाटे ४ वाजेपासून अग्निशामक दलाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु फोन लागलाच नाही. त्यानंतर सकाळी ५:१५ वाजेपासून सतत संपर्क साधल्यानंतर अग्निशमन दलाचे पहिले वाहन सकाळी तब्बल ६:३० वाजता घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत दुकानांमधील बहुतांश साहित्य जळून भस्मसात झाले होते.  

दरम्यान, लोणार येथील अग्निशमन दलाची दुसरी गाडी आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर पोहोचल्याने नागरिकांच्या रोषात आणखी भर पडली. प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि अग्निशामक यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप व्यक्त होत आहे. आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी दोन्ही दुकानदारांचे संपूर्ण आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments