सुलतानपूर (गावकरी टाइम्स/मोईन खान):
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या सुलतानपूर गावात सध्या मोकाट डुकरांचा उपद्रव शिगेला पोहोचला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला असून, त्वरित ठोस कारवाई न झाल्यास येत्या १५ नोव्हेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सुलतानपूर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव असून येथे वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएस, बीएएमएस, डी. फार्मसी आणि नर्सिंगचे शेकडो विद्यार्थी बाहेरगावाहून येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावात मोकाट डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही डुकरे थेट गल्ल्यांमध्ये आणि रहिवाशांच्या घरांसमोर घाण करत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरण्याची दाट भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
धार्मिक स्थळे आणि स्मारकांच्या पावित्र्याला बाधा
गावातील वॉर्ड क्रमांक एक मधील रझा मशीद परिसर, मुस्लिम कब्रस्तान तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे. धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ डुकरांचा वावर असल्याने परिसरातील स्वच्छता व पवित्रता धोक्यात आली असून भाविकांच्या भावना दुखावत आहेत. तसेच मुख्य महामार्ग आणि रस्त्यांवरही डुकरे अचानक समोर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
प्रशासनाला निवेदने, उपोषणाचा इशारा
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या तक्रार अर्जाच्या प्रती लोणारचे तहसीलदार, गटविकास अधिकारी (पंचायत समिती, लोणार) तसेच मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने डुकरांचा तातडीने बंदोबस्त करून संबंधित मालकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा १५ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

0 Comments