उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई; वारंवार संपर्क करूनही पोलीस बीट जमादार मात्र गैरहजर!
लोणार / सुलतानपूर(गावकरी टाइम्स):
मौजे बोरखेडी येथील लघु संग्राहक तलावावरून सुरू असलेल्या बेकायदेशीर पाणी उपशाविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत जोरदार धडक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी (लोणार) यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बोरखेडी तलावावर छापा टाकून अवैध पाणी उपसा करणारी साधनसामग्री जागीच जप्त करण्यात आली, ज्यामुळे बेकायदेशीर पाणी चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी काय झाली कारवाई?
बोरखेडी लघु संग्राहक तलावावर पाहणी केली असता, प्रशासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान पथकाने घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त केले:
गजानन ज्ञानबा सिरसाट: यांची ५ एच.पी. क्षमतेची विद्युत मोटर, ४०० फूट केबल व १ स्टार्टर जप्त करण्यात आले.
निशांत गजानन सिरसाट: यांची ७.५ एच.पी. क्षमतेची विद्युत मोटर, ३५० फूट केबल व १ स्टार्टर जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या दोन्ही विद्युत मोटारी सिंचन विभागाचे मोजणीदार कैलास आव्हाडे यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत, तर तब्बल ७५० फूट केबल आणि दोन स्टार्टर महावितरणचे कर्मचारी दीपक साळवे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान पथकात कोण होते हजर?
या धडक मोहिमेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा स्वतः हजर होता. यामध्ये:
मा. प्रशांत सानप (उपविभागीय अधिकारी, लोणार)
मा. मयूर अय्यर (नायब तहसीलदार, लोणार)
व्ही. डी. केंद्रे (मंडळ अधिकारी, हिडव)
एस. पी. पनाड (मंडळ अधिकारी, सुलतानपूर)
बी. एस. पवार (ग्राम महसूल अधिकारी, पार्डी सिरसाट)
एस. व्ही. वाळुकर (ग्रामपंचायत अधिकारी, पार्डी)
दीपक साळवे (लाईनमन, महावितरण सुलतानपूर)
कैलास आव्हाडे (मोजणीदार, शाखा सुलतानपूर)
कारवाईदरम्यान पोलिसांची दांडी; चर्चेला उधाण!
एकीकडे महसूल, ग्रामपंचायत आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी तळ ठोकून कारवाई करत असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कारवाईदरम्यान पोलीस बीट जमादार प्रशांत गवई यांना दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधून बोलावण्यात आले होते; मात्र तरीही ते घटनास्थळी हजर झाले नाहीत, अशी स्पष्ट नोंद शासकीय पंचनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या या भूमिकेबद्दल सध्या परिसरात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी सविस्तर पंचनामा करण्यात आला असून, जलसाठ्यांवर डल्ला मारणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

0 Comments