विजयादशमीच्या मंगल पर्वावर सुलतानपूर येथील दसरा वाटिकेत ज्ञान, संस्कृती आणि सेवाभावाचा संगम पाहायला मिळाला. समस्त कष्टकरी संघाच्या वतीने आयोजित सोहळ्यात गावाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे 'वाचनऋषी' मोईन हारुण काबरा (कच्छी) आणि प्रसिद्धीपराङ्मुख राहून समाजकार्य करणारे 'कर्मयोगी' वामनराव जनार्दन राजगुरू यांना 'ग्रामरत्न पुरस्कार २०२६' प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दसर्याच्या दिवशी विचारांचे सोने लुटण्याच्या उद्देशाने दसरा वाटिकेत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपती डॉ. हेमराज लाहोटी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष वामनराव झोरे, माऊली मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष संजय लाहोटी, श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वसंतराव देसाई, राष्ट्रीय सेवा संघाच्या सद्भावना मंचाचे शांतीलाल बोराळकर, संतकृपा समूहाचे वसंत जुमडे यांच्यासह मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कारार्थींचा कार्यगौरव:
डिजिटल युगात पुस्तकांशी नाते जोडून वाचनसंस्कृतीचा ध्यास घेणारे मोईन हारुण काबरा यांच्या अखंड ज्ञानसाधनेची दखल राज्यस्तरावरही घेण्यात आली आहे. नव्या पिढीला वाचनाची दिशा देणाऱ्या त्यांच्या या कार्याचा 'ग्रामरत्न' पुरस्काराने यथोचित गौरव करण्यात आला.
तर दुसरीकडे कष्ट, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी सेवाभावाच्या जोरावर समाजासमोर आदर्श उभा करणारे वामनराव राजगुरू यांच्या जीवनकार्याचा सन्मान करताना उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
या सोहळ्यास आश्रुबा भानापुरे, गजानन भानापुरे, गोविंद रिंढे, राजेश पिंपरकर, मनोहर भानापुरे, महेंद्र पनाड, अर्जुनराव रिंढे, प्रल्हाद टकले, डॉ. विनोद भानापुरे, साहेबराव झोरे, सुभाष खेत्रे, संजाब खरात, दामोदर लाहोटी, मधुकर भानापुरे, ज्ञानेश्वर हरकाळ, गणेश रत्नपारखी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार व राजेश जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कष्टकरी संघाचे अध्यक्ष सागर पनाड यांनी केले, तर सूत्रसंचालन वैभव टकले यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कष्टकरी संघाचे संघटन सचिव भाऊराव भालेराव यांनी परिश्रम घेतले. माजी सरपंच सुखदेवराव देसाई यांनी आभार मानले. कर्तृत्वाचा सन्मान करून नव्या पिढीला दिशा देणाऱ्या कष्टकरी संघाच्या या उपक्रमाचे सुलतानपूर पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

0 Comments