लोणार तहसील कार्यालयातील महसूल कामकाजादरम्यान एका वकिलाला दालनात अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सिरसाट येथील एका रस्त्याच्या प्रकरणात वकिलपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या लोणार तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. एस. ए. अवचार यांच्याशी नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत वकील संघाने थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (SDO) तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे लोणार महसूल प्रशासन आणि वकील वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे तक्रार?
वकील संघाने दिलेल्या निवेदनानुसार, सिरसाट येथील 'धर्मा गवई व इतर विरुद्ध ज्ञानेश्वर सिरसाट व इतर' या रस्त्याशी संबंधित प्रकरणात पक्षकाराला २७ सप्टेंबर २०२६ रोजी नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर पक्षकाराची बाजू कायदेशीररीत्या मांडण्यासाठी ॲड. एस. ए. अवचार हे २९ सप्टेंबर २०२६ रोजी वकिलपत्र घेऊन नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांच्या दालनात हजर झाले. पक्षकाराला बाजू मांडण्याची नैसर्गिक व कायदेशीर संधी देण्याची मागणी ॲड. अवचार यांनी केली.
मात्र, हे प्रकरण निकालासाठी आधीच बंद करण्यात आले असून आता वकिलपत्र स्वीकारले जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतकेच नव्हे तर, उपस्थित पक्षकार आणि नागरिकांसमोरच ॲड. अवचार यांना “तुझ्याकडून काय होते ते करून घे” आणि “तुझ्यासारखे लय वकील पाहिले” या शब्दांत अपमानास्पद वागणूक दिल्याचे वकील संघाच्या निवेदनात म्हटले आहे.
व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का, 'बार आणि बेंच' समन्वयावर प्रश्नचिन्ह
भरदालनात झालेल्या या कथित वर्तनामुळे वकिलांच्या व्यावसायिक अधिकारांवर गदा आल्याचे आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचल्याचे वकील संघाने स्पष्ट केले. कोणत्याही न्यायिक किंवा महसुली प्रक्रियेमध्ये पक्षकाराचे प्रतिनिधित्व करणे हा वकिलाचा कायदेशीर अधिकार आहे. 'बार आणि बेंच' यांच्यातील परस्पर आदर व समन्वय हाच न्यायव्यवस्थेचा पाया असून, अशा घटनांमुळे प्रशासन आणि वकिलांमधील सलोख्याला तडे जाण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
वकील संघाच्या प्रमुख मागण्या:
१. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून ॲड. एस. ए. अवचार यांच्या झालेल्या अपमानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी व बिनशर्त माफी मागावी.
२. नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांची तातडीने बदली करण्यात यावी आणि त्यांच्या अखत्यारीतील प्रकरणे अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावीत.
वकील संघाचे शिष्टमंडळ आक्रमक
या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, लोणार यांना सादर करण्यात आले. यावेळी लोणार तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रणजीत डव्हळे यांच्या नेतृत्वाखाली ॲड. सुधाकर अवचार, ॲड. विठ्ठल तनपुरे, ॲड. शिवाजी सानप, ॲड. सदाशिव मुंढे, ॲड. दीपक मापारी, ॲड. शिवम पालवे, ॲड. आशिष तिनगुरिया, ॲड. विष्णू वाघ, ॲड. निशांत वायाळ, ॲड. ओम भालेराव, ॲड. भूषण सानप, ॲड. गजानन आवारे, ॲड. संतोष भाकडे, ॲड. लहाने, ॲड. अवसरमोल, ॲड. फौजिया अली यांच्यासह वकील संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणात महसूल प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments