लोणार तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; शिवसेना (उबाठा) आक्रमक! १५ ऑक्टोबरपासून ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा डॉ. गोपाल बच्छीरे यांचा इशारा


लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान):
लोणार शहर आणि ग्रामीण भागामध्ये सध्या वरली-मटका, प्रतिबंधित गुटखा आणि अवैध देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री सुरू असून याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट आरपारची लढाई पुकारली आहे. "हे अवैध धंदे तत्काळ बंद करा, अन्यथा येत्या १५ ऑक्टोबर २०२६ पासून लोणार पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडू," असा खणखणीत इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिला आहे. यासंदर्भात लोणार पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना थेट निवेदन सादर करण्यात आले.


दुष्काळात संसारांची राखरांगोळी; तरुण पिढी जुगार-व्यसनाच्या विळख्यात
लोणार तालुका सध्या तीव्र दुष्काळाच्या संकटाशी सामना करत आहे. शेतकरी आणि शेतमजूर मेटाकुटीस आलेले असताना, दुसरीकडे तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांमुळे सामाजिक वातावरण अक्षरशः विषारी बनले आहे.
कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या: मटका आणि दारूच्या व्यसनामुळे अनेक शेतकरी दिवाळखोरीत निघत असून त्यांच्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत आहे.
तरुणांचे भवितव्य धोक्यात: प्रतिबंधित गुटखा आणि जुगाराच्या नादात तालुक्यातील युवा पिढी उद्ध्वस्त होत असून घराघरांत भांडणे व कलह वाढले आहेत.
प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम: सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी हे अवैध धंदे मुळासकट उखडून टाकणे गरजेचे आहे. पुढील आठ दिवसांत ठोस मोहीम उघडून हे अड्डे उद्ध्वस्त न झाल्यास थेट पोलीस ठाण्याच्या दारात प्राणांतिक उपोषण बसण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पातळीवर निवेदने; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या गंभीर प्रकरणाची दखल घेत निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी (मेहकर-लोणार) आणि लोणार तहसीलदार यांना कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून लोणार पोलीस आता काय धडक पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी नगराध्यक्ष बाशा खान, श्रीकांत मादनकर, तारामती जायभाये, प्रकाश सानप, तानाजी अंभोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, ओवेस कुरेशी, उमर सय्यद, फहीम खान, उमेश मोरे, समाधान साळवे, संदीप मदनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments