लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान):
जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ असलेल्या लोणार बसस्थानकावर प्रवाशांसाठी अत्यंत गरजेची असलेली ऑनलाईन आरक्षण प्रणाली (ORS) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सुविधा पूर्ववत सुरू न झाल्यास लोणार बसस्थानकासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा 'प्रवासी सेवा असोसिएशन'च्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणार बसस्थानकावर २०१४ ते २०१९ या कालावधीत ऑनलाईन आरक्षण सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, टेंडर संपल्याचे कारण देत ही सेवा अचानक खंडित करण्यात आली. त्यानंतर प्रवासी सेवा संघटनेच्या पाठपुराव्यामुळे २० डिसेंबर २०२० रोजी ही सुविधा पुन्हा कार्यान्वित झाली होती. परंतु २०२३ पासून ही यंत्रणा पुन्हा बंद पाडण्यात आली असून मेहकर आगाराकडून लोणार बसस्थानकावरील आरक्षणाचे साहित्य थेट मेहकर येथे नेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्यामुळे लोणार परिसरातील नागरिकांना तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना साध्या बस आरक्षणासाठीही मेहकर गाठावे लागत असून, यात त्यांचा वेळ आणि नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय लोणार बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बुलढाणा विभागीय कार्यालय आणि मेहकर आगार व्यवस्थापकांचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत प्रवासी सेवा असोसिएशनने दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रादेशिक व्यवस्थापक (अमरावती) आणि महाव्यवस्थापक-वाहतूक (मुंबई) यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवून ही सुविधा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. जर ही ऑनलाईन आरक्षण प्रणाली तात्काळ सुरू करण्यात आली नाही, तर लोणार बसस्थानकासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल, असा थेट इशारा संघटनेचे अध्यक्ष शेख उस्मान शेख दाऊद, सचिव भागवत प्रल्हाद खरात आणि उपाध्यक्ष अशोक राजाराम काटकर यांनी दिला आहे.

0 Comments