साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
श्री गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्न, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी साखरखेर्डा पोलिसांनी शहरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) भव्य रूट मार्च काढला. पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत बसस्थानक परिसरात 'दंगा काबू योजने'चे (Riot Control Scheme) यशस्वी प्रात्यक्षिकही राबवले.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११.०५ ते दुपारी १२.१५ या वेळेत हा रूट मार्च पार पडला. शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध संचलन करत पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली.
खाकीचा कडक पहारा
या रूट मार्चमध्ये साखरखेर्डा पोलीस ठाण्यासह परिसरातील इतर ठाण्यांची कुमक तैनात करण्यात आली होती. यामध्ये साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व २० अंमलदार, साखरखेर्डा स्ट्रायकिंग फोर्सचे २ अधिकारी, लोणारचे १ अधिकारी व ५ अंमलदार, मेहकरचे १ अधिकारी व ५ अंमलदार, मेहकर स्ट्रायकिंग फोर्सचे १५ अंमलदार, एसआरपीएफचे (SRPF) १९ जवान, आरसीपी मेहकरचे पथक आणि ३० गृहरक्षक दलाचे (Home Guard) जवान सहभागी झाले होते.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
रूट मार्चदरम्यान पोलीस वाहनावरील पीए सिस्टीमद्वारे (ध्वनिक्षेपक) नागरिकांना विसर्जन मिरवणूक शांततेत, नियमांचे पालन करून आणि उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी स्पष्ट केले.

0 Comments