गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेल्या प्रदीर्घ दडीमुळे लोणार तालुक्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. डोळ्यांसमोर उभी पिके करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, तालुक्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील २२ गावांच्या शिवारात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
कर्ज काढून पेरणी, आता पदरी निराशा
खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी पदरमोड करून तसेच बँका आणि सावकारांकडून कर्ज काढून सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद आणि फळबागांची लागवड केली होती. बियाणे, खते, मशागत आणि महागड्या फवारण्यांवर मोठा खर्च झाला. मात्र, ऐन भरात असताना पावसाने तब्बल दीड महिना खंड दिल्याने उभी पिके जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत. पिकांवर केलेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने "संसार कसा चालवायचा आणि कर्जाची परतफेड कशी करायची?" या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
शेतशिवारात भावूक वातावरण
पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी जळालेली पिके हातात धरून आपल्या व्यथा मांडल्या. अनेक शेतकऱ्यांना परिस्थिती सांगताना अश्रू अनावर झाले. "ही केवळ पिकांची नाही, तर आमच्या जगण्याची पाहणी आहे," अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली. संजय रायमुलकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
शासनाकडे पाठपुरावा करणार: संजय रायमुलकर
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. मेहकर आणि लोणार तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आधीच राज्य शासनाकडे करण्यात आली असून, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळेपर्यंत शासन दरबारी ठामपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही रायमुलकर यांनी दिली.
या २२ गावांमध्ये झाली पाहणी
दौऱ्यादरम्यान अंत्री देशमुख, मोहोतखेड, मातरखेड, गुंधा, वेणी, बागुलखेड, गुंजखेड, जाफराबाद, दाभा, पहूर, आरडव, वढव, कौलखेड, सोनुना, शिवनी जाट, गंधारी, सावरगाव मुंडे, रायगाव, नांद्रा, टिटवी, धाड आणि पांग्रा डोळे या गावांतील शेतशिवारांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक दिलीपराव देशमुख, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, नीरज रायमुलकर, राजेश तांबिले, प्रल्हादराव सुलताने, सुनील सुलताने, विठ्ठल घायाळ, डॉ. मारोती मोरे, अबाराव हाडे, रमेश हाडे, अंकुश मुंडे, सदाशिव मुंडे, शिवाजी मोरे, भगवानराव कोकाटे, गजानन सरकटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments