चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मध्यरात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या असून, काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा त्यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी टळला असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या थेट संभाषणानंतर बोंद्रे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
मध्यरात्री असा फिरला घटनाक्रम
राहुल बोंद्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात वेग धरला होता. मात्र, प्रवेशाच्या काही तास आधी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. या भावनिक आणि राजकीय चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना धीर देत पक्षासोबतच राहण्याचे आवाहन केले आणि त्यांना थेट दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले.
समर्थकांची गर्दी आणि घोषणाबाजी
या घडामोडींनंतर राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक जमा झाले होते. "राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या भावना आणि दिल्लीतून आलेला फोन यानंतर बोंद्रे यांनी मुंबईऐवजी दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला.
आता दिल्लीतील बैठकीकडे लक्ष
मुंबईकडे जाणारी गाडी ऐनवेळी दिल्लीकडे वळल्याने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात दिल्लीत नेमकी काय चर्चा होते, काँग्रेस पक्षाकडून त्यांना कोणती मोठी जबाबदारी दिली जाते आणि त्यांचा भाजप प्रवेश पूर्णपणे रद्द होतो का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

0 Comments