नागरिक, शिक्षक आणि पत्रकारांच्या लढ्याला यश; साखरखेर्डा उर्दू शाळेसमोरील दुकाने हटवली!

साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मटन, चिकन आणि मासळी विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानांमुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता, दुर्गंधी आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला होता, ज्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली होती. माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अकील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक, पालक व पत्रकारांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, शाळेसमोरील ही सर्व अनधिकृत दुकाने हटविण्यात आली आहेत.


शाळेचा परिसर स्वच्छ, निर्धोक आणि शैक्षणिक वातावरणाला पोषक असावा, यासाठी शेख अकील यांच्यासह अस्लम शाह, युनूस शाह, आसिफ कुरेशी, उर्दू हायस्कूल समितीचे अध्यक्ष मुख्तार शाह, अशपाक शाह, मन्नान शाह तसेच ‘दैनिक विदर्भ भास्कर’चे प्रतिनिधी जुबेर शाह यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रारी करून ठोस कारवाईची मागणी लावून धरली होती. शाळेतील सर्व शिक्षकवृंदानेही या मोहिमेला खंबीर साथ दिली.

शिक्षकांकडून पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत हा संवेदनशील प्रश्न मार्गी लागल्याने जि. प. उर्दू शाळेच्या वतीने पुढाकार घेणाऱ्या सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेत सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दाखविलेल्या जागरूकतेबद्दल शिक्षकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमाला नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद इशरत, उपाध्यक्ष नजीम कुरेशी, रजिक ठेकेदार, शेख राजू भाई, शेख जाकीर, शारिक कुरेशी, शेख शाहरुख, आसिफ शाह, तहेजीब शाह आणि शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

शाळा परिसरातील ही दुकाने हटल्यामुळे प्रवेशद्वार मोकळे झाले असून परिसरात स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईबद्दल पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींतून समाधान व्यक्त केले जात असून, शाळेचे वातावरण सुरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा सूर यावेळी उमटला.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments