लोणारच्या पार्टीत विष पाजले, किनगाव राजाच्या शिवारात फेकला मृतदेह; १.५ लाखांच्या 'सुपारी किलिंग'चा धक्कादायक पर्दाफाश!

किनगाव राजा(गावकरी टाइम्स/रफीक सय्यद):
किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या पाच तासांत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दारूमध्ये विष कालवून मित्राचीच हत्या करण्यासाठी चक्क १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.


सोयाबीनच्या शेतात आढळला होता मृतदेह

साकेगाव (ता. चिखली) येथील उमेश रमेश परिहार (वय ३८) हे ९ सप्टेंबर रोजी मुलांना भेटण्यासाठी मडाखेड येथे गेले होते. मात्र ११ सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव शिवारात, रस्त्यालगत घनश्याम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच्या तोंडा-नाकातून रक्त आलेले होते आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. वडिलांच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.

असा रचला हत्येचा कट

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत उमेश परिहार आणि मुख्य आरोपी गणेश मोतीसिंग राजपूत (वय ३९, रा. उतरादा) यांच्यात जुना वाद होता. या वादाचा कायमचा काटा काढण्यासाठी गणेश राजपूतने सागर पवार (वय ५०, रा. उतरादा) याच्यामार्फत नईमखाँ उमरखाँ पठाण (वय ५०, रा. ईसोली) व गणेश पुंबाजी काळे महाराज (वय ४२, रा. सारस्वती, ता. लोणार) यांना उमेशच्या हत्येसाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिली.

दारूत विष कालवून निर्घृण हत्या

९ सप्टेंबर रोजी आरोपींनी उमेशला सोबत घेऊन साखरखेर्डा मार्गे लोणार येथे नेले. तेथे सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर आरोपींनी कट रचून उमेशच्या दारूच्या बाटलीत विष मिसळले आणि ती दारू त्याला पाजली. विषबाधेमुळे उमेशचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तढेगाव शिवारातील सोयाबीनच्या शेतात फेकून दिला.

पोलिसांची धडक कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या पाच तासांत चारही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून किनगाव राजा पोलीस पुढील तपास करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments