कमी दरात अस्सल सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांच्या टोळीने पुण्याच्या एका ठेकेदाराची ७ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आधी खरा सोन्याचा नमुना दाखवून विश्वास संपादन करायचा आणि नंतर खोट्या सोन्याच्या नाण्यांची (गिल्या) पोटली देऊन रोकड घेऊन पसार व्हायचे, अशा चलाखीने हा कट रचण्यात आला.
पुण्यातील भोसरी येथील व्यावसायिक साईनाथ दिपा धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नागपूर येथील रहिवासी अनिल आधार मोहिते याच्यासोबत कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. अनिलने "मित्राला सापडलेले सोने स्वस्तात विकायचे आहे" असे सांगून धोत्रे यांच्याशी व्यवहार जुळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार देणाऱ्या धोत्रे यांनी अनिलच्या वारंवार आग्रहावर विश्वास ठेवला.
व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून अनिलला यूपीआयद्वारे ५ हजार रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर सिंदखेडराजा येथे बोलावून अनिल व त्याच्या साथीदाराने धोत्रे यांना सोन्याचा एक लहान तुकडा नमुना म्हणून दिला. पुण्यात येऊन सोनाराकडून तपासणी केली असता ते सोने पूर्णपणे खरे असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे धोत्रे यांचा टोळीवर पूर्ण विश्वास बसला.
यानंतर मोठा व्यवहार ठरवून ५-६ सप्टेंबर रोजी धोत्रे यांना पत्नीसह सुमारे ८ लाख रुपयांची रोकड घेऊन सिंदखेडराजा बसस्थानकावर बोलावण्यात आले. ठरल्याप्रमाणे आरोपींनी ७ लाख ९५ हजार रुपये रोख स्वीकारले आणि सोन्याच्या नाण्यांचे गाठोडे धोत्रे यांच्या हाती दिले. व्यवहार पूर्ण होताच "तुमच्या मागे पोलीस/लोक लागले आहेत, तातडीने निघून जा," असा बनाव करत आरोपींनी त्यांना घाईघाईने बसमध्ये बसवून दिले.
जालन्यात पोहोचल्यानंतर गाठोडे उघडून तपासले असता संशय आला. त्यानंतर पुण्यात खात्री केली असता सर्व नाणी बनावट व पितळी असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धोत्रे यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुख्य संशयित अनिल मोहिते व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

0 Comments