मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे मेहकर जवळील डोंगाव परिसरात एक भीषण अपघात झाला. यात गुजरातच्या राजकोट येथील २१ वर्षीय कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट पासिंग असलेली पांढरी ह्युंदाई वरना कार (GJ 03 PD 1004) नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात होती. मेहेकर जवळील चॅनेल क्रमांक २६३ वर सोमवारी पहाटे ५.१० वाजता कारने पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले.
यात कार चालक हिरेन रमेशभाई सिद्धपुरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत प्रवास करणारे तुषार मकवाना आणि विरेन सिद्धपुरा हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षाकडून वारी महामार्ग उपकेंद्राला अलर्ट करण्यात आले. मलकापूर येथील उपकेंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश खडसे, चालक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी अवघ्या २१ मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने मेहेकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच, अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला करून वाहतुकीचा अडथळा दूर केला.
या भीषण अपघातामुळे सिद्धपुरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर पहाटेच्या वेळी प्रवास करताना चालकांनी झोप, वेग आणि अंतर याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

0 Comments