ग्रामस्थांचा लढा अन् 'गावकरी टाईम्स'च्या बातमीचा जोरदार इम्पॅक्ट; सुलतानपूर ग्रामपंचायतीने नालीवरील अतिक्रमण केले जमीनदोस्त!


सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न आणि वॉर्ड क्रमांक ५ मधील कन्या शाळेच्या रस्त्याची झालेली दुरवस्था यावरून संतप्त ग्रामस्थांनी पुकारलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्याची आणि या जनसमस्येला वाचा फोडणाऱ्या 'गावकरी टाईम्स'च्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली. प्रशासनाने ७ सप्टेंबर रोजी ब्रेकर मशीनच्या साहाय्याने नालीवरील ढापे तोडून अतिक्रमण हटवले असून पाण्याचा निचरा सुरळीत केला आहे.


वॉर्ड क्रमांक ३ मधील रहिवासी शिवप्रसाद किसन जोगदंड, सौ. संगीता जोगदंड व सुभाष खेत्रे यांनी गेल्या तीन वर्षांपासून घरासमोरील नालीत तुंबणाऱ्या घाण पाण्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची कैफियत मांडली होती. तसेच वॉर्ड क्र. ५ मधील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या रस्त्यावरील चिखलामुळे विद्यार्थिनींचे होणारे हाल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता.

नागरिकांच्या या न्याय्य हक्काच्या लढ्याला 'गावकरी टाईम्स'ने प्रसिद्धी देत प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. ग्रामस्थांचे निवेदन आणि प्रसिद्ध झालेले वृत्त यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले.

नाली मोकळी, रस्त्याचे काम १६ व्या वित्त आयोगात प्रस्तावित

प्रशासनाने तक्रारदारांना दिलेल्या अधिकृत पत्रानुसार (जा.क्र. ३५५, दि. ८/९/२०२६), ७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी ब्रेकर मशीन लावून नालीवरील ढापे तोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता नालीत पाणी तुंबून राहत नसून निचरा व्यवस्थित सुरू झाला आहे. पुराव्यादाखल प्रशासनाने जिओ-टॅगिंग छायाचित्रेही जोडली आहेत. याशिवाय, कन्या शाळेच्या रस्त्याचे काम विविध योजनांसह १६ व्या वित्त आयोगामध्ये प्रस्तावित करण्यात आले असून, लवकरच रस्त्याचे काम सुरू केले जाईल, अशी लेखी ग्वाही ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिली आहे.
समस्या मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून या पत्राची प्रत बीडीओ (पं.स. लोणार), तहसीलदार (लोणार) आणि पोलीस निरीक्षक (मेहकर) यांनाही पाठवण्यात आली आहे. ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण लढा आणि माध्यमांचे पाठबळ यामुळे वर्षांनुवर्षे प्रलंबित नागरी प्रश्न अवघ्या काही दिवसांत सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या दाव्यानंतरही आंदोलक भूमिकेवर ठाम:

"ग्रामपंचायतीने नालीवरील अतिक्रमण हटवल्याचे पत्र दिले असले, तरी प्रत्यक्ष जागेवर समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत आणि शाळेच्या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत आमचा आंदोलनाचा इशारा कायम आहे. प्रशासनाच्या या पत्राने आमचे समाधान झालेले नसून १२ सप्टेंबरच्या नियोजित आंदोलनावर आम्ही ठाम आहोत," अशी माहिती तक्रारदार शिवप्रसाद जोगदंड यांनी दिली.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments