आधी ग्रामपंचायतीला कुलूप, मग आमदारांची एन्ट्री! सुलतानपुरात ५ लाखांचा निधी अन् रस्त्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

सुलतानपूर (गावकरी टाईम्स वृत्तसेवा):
येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून सुरू झालेले तीव्र आंदोलन अखेर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनाच्या ठोस लेखी आश्वासनानंतर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले. वॉर्ड क्रमांक ३ मधील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार खरात यांनी तात्काळ ५ लाख रुपयांचा आमदार निधी देण्याची घोषणा केली. तर वॉर्ड क्रमांक ५ मधील शाळेच्या रस्त्याचे काम १० महिन्यांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले.



सुभाष खेत्रे यांनी कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतले होते

वॉर्ड क्रमांक ५ मधील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि वॉर्ड क्रमांक ३ मधील नालीच्या समस्येवरून आंदोलक सुभाष भिवसन खेत्रे यांनी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून स्वतःला आत कोंडून घेतले होते. बाहेर शिवप्रसाद जोगदंड आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता जोगदंड याही ठाम भूमिकेत उपस्थित होत्या. प्रशासनाने आधी कारवाईचे पत्र दिले होते; मात्र प्रत्यक्ष कामाच्या कालमर्यादेचे लेखी आश्वासन मिळावे या मागणीवर खेत्रे ठाम होते. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली होती.

प्रशासनाकडून १० महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे लेखी पत्र

सकाळपासून झालेल्या चर्चेनंतर ग्रामसेवक तेजनकर यांनी सुभाष खेत्रे यांना अधिकृत पत्र दिले. यामध्ये वॉर्ड क्रमांक ५ मधील शाळेच्या रस्त्याचे काम विविध योजना व १६ व्या वित्त आयोगातून हाती घेऊन "सदर रस्त्याचे काम १० महिन्यांत प्राप्त करण्यात येईल" अशी लेखी नोंद करून स्वाक्षरीसह हमी दिली. या ठोस लेखी आश्वासनानंतर सुभाष खेत्रे यांनी कुलूप उघडून बाहेर येण्याचा निर्णय घेतला.

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या एन्ट्रीने ५ लाखांचा निधी मंजूर

या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ खरात यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी थेट हस्तक्षेप करत वॉर्ड क्रमांक ३ मधील नालीच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. "तुम्ही आजच या, मी नालीच्या कामाचे अधिकृत पत्र देतो," असा थेट आदेश त्यांनी ग्रामसेवकांना दिला. आमदार खरात यांच्या या तत्पर आणि दिलासादायक घोषणेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करत त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार खरात यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून गावातील इतर मूलभूत समस्याही जाणून घेतल्या. आमदार निधीचा शब्द आणि प्रशासनाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर शिवप्रसाद जोगदंड, संगीता जोगदंड व सुभाष खेत्रे यांनी आपले आंदोलन अधिकृतरीत्या मागे घेतले. जनआक्रोश, प्रशासनाची धावपळ आणि लोकप्रतिनिधींचा पुढाकार यामुळे सुलतानपुरात रंगलेल्या या नाट्यमय आंदोलनाला अखेर सुखांत मिळाला.

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७


Post a Comment

0 Comments