शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. लोणार तालुक्यातील खापरखेड लाड शिवारातील वाळू घाटावर महसूल पथकाने छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे ६ टिप्पर आणि ३६ ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
असा लागला छडा:
मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी सानप तसेच महसूल सेवक मधुकर मिसाळ व मिलींद चव्हाण यांच्या पथकाने खापरखेड लाड येथील लिलाव न झालेल्या वाळू साठ्याची अचानक पाहणी केली. रात्री पावणेबाराच्या सुमारास वाळू घाटावरून ६ मोठे टिप्पर विनापरवाना वाळू भरून निघाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तत्काळ कारवाई करत सर्व वाहने जागीच अडवली.
जप्त वाहने व मुद्देमालाचा तपशील:
पंचनामा दरम्यान वाहनांची तपासणी केली असता, प्रत्येक वाहनात ६ ब्रास वाळू (अंदाजे किंमत ३६,००० रुपये) भरलेली आढळली.
टिप्पर क्र. MH 28 BB 2130: वाहन मालक दिलीप वायाळ व चालक सोनू सुभाष
टिप्पर क्र. MH 28 BB 6042: वाहन मालक व चालक रवी बाबुराव जाधव
टिप्पर क्र. MH 28 BA 6042: वाहन मालक रवी बाबुराव जाधव व चालक
टिप्पर क्र. MH 28 BX 7090: वाहन मालक इम्रान शेख व चालक
टिप्पर क्र. MH 28 CF 0179: वाहन मालक अरुण लाड व चालक
टिप्पर क्र. MH 28 BB 9925: वाहन मालक डॉ. केशव अवचार व चालक पंकज भुजंग भालेराव
सर्व ६ वाहने (प्रत्येकी किंमत अंदाजे ३५ लाख रुपये) आणि एकूण ३६ ब्रास वाळू मिळून १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
कोणतीही रॉयल्टी नाही; पोलिसांत गुन्हा दाखल:
पथकाने चालकांकडे वैध रॉयल्टी पास अथवा वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळले नाही. ही वाळू तुळजाई प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या डॉ. केशव अवचार यांच्या साठ्यावरून भरून आणल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
या प्रकरणी किनगाव जट्टू येथील प्रभारी ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) तसेच गौण खनिज अधिनियम कलम ४८ (७) व ४८ (८) अन्वये वाहन मालक व चालकांसह एकूण १२ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. जप्त केलेली वाहने बिबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments