जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घोषित केलेल्या 'आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिना'निमित्त (ISBAD) आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ लोणार येथील 'दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय' येथे भव्य जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १५० पेक्षा अधिक सर्पमित्र सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन, 'मी लोणारकर' टीम आणि भारत सिरम अँड वॅक्सिन (BSV) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जगभरातील सर्पदंशाच्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ४०% मृत्यू एकट्या भारतात होतात, ज्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा धोका ओळखून ग्रामीण पातळीवर योग्य जनजागृती आणि प्रथमोपचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिग्गजांचे मोलाचे मार्गदर्शन
श्री. नीलीमकुमार खैरे (विख्यात सर्पतज्ज्ञ, कात्रज सर्पोद्यानाचे निर्माते):
आपल्या खुमासदार शैलीतील भाषणातून त्यांनी सर्पमित्रांना मार्गदर्शन करत साप, मानवी जीवन आणि पर्यावरण संतुलन याविषयी महत्त्वपूर्ण पैलू उलगडले.
डॉ. अनिलकुमार गाभणे (स्नेक बाईट क्लिनिकल तज्ज्ञ, मेहकर):
गेल्या ३०-३५ वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून त्यांनी सर्पदंशानंतरचे उपचार (Post Snake Bite Treatment) आणि प्राथमिक काळजी यावर तांत्रिक व सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थी बँड पथकासह भव्य जनजागृती रॅली
कार्यक्रमादरम्यान सर्पदंशाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल आणि लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी तसेच बँड पथक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थित सर्पमित्रांना सुरक्षिततेसाठी सर्प रेस्क्यू किटचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, नगराध्यक्ष भूषण मापारी, वन्यजीव विभागाचे डीएफओ यशवंत नागुलवार, आरएफओ रामटेके, कात्रज सर्पोद्यानाचे संचालक महेश देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक किशोर पाठक, बुलढाणा मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे, गजानन खरात, विनय कुलकर्णी यांच्यासह निसर्ग फाउंडेशन व ‘मी लोणारकर’ टीमचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.

0 Comments