ज्ञानमंदिरात चोरांचा हैदोस! सिंदखेडराजा तालुक्यातील शाळा फोडली; LED, CCTV सह पोषण आहारावरही डल्ला, १.७५ लाखांचा ऐवज लंपास


सिंदखेड राजा (गावकरी टाइम्स/इसराइल शेख):
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या ज्ञानमंदिरालाच चोरांनी लक्ष्य केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या तब्बल सात वर्गखोल्या आणि मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत प्रचंड तोडफोड केली आणि सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

कार्यालयासह ७ वर्गखोल्यांची तोडफोड

मुख्याध्यापक महेश सुभाष नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर सर्व खोल्या सुरक्षित बंद करून शिक्षक घरी गेले होते. दरम्यान, २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शालेय समिती अध्यक्षांना शाळेच्या खोल्या उघड्या असल्याचे आणि साहित्याची नासधूस झाल्याचे निदर्शनास आले.  
मुख्याध्यापकांनी तातडीने शाळेत धाव घेऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी सातही वर्गखोल्या आणि कार्यालयाची कुलपे तोडून आत धुमाकूळ घातल्याचे समोर आले. चोरट्यांनी कार्यालयातील संगणकाचे CPU, CCTV कॅमेरे, DVR, प्रोजेक्टर सिस्टीम, सेटअप बॉक्स, UPS, तसेच दोन बॅटऱ्या आणि विद्यार्थ्यांचे क्रिकेट किट चोरून नेले. एवढेच नव्हे तर अनेक LED टीव्हीची तोडफोड करून मोठे नुकसान केले.  

शालेय पोषण आहाराचे साहित्यही पळवले!

धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शालेय पोषण आहाराच्या धान्यावरही डल्ला मारला. चोरट्यांनी पोषण आहारातील तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, मटकी, वाटाणा, तेलाची २४ पाकिटे आणि मसाल्याचे साहित्यही लंपास केले.  
पोलिसांत गुन्हा दाखल
शाळेतील एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य आणि धान्याची चोरी झाल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(१), ३०५(A), ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू मुंढे करत आहेत.  
ज्ञानमंदिराची झालेली ही दुर्दशा पाहून परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या विकृत चोरांचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments