सोशल मीडियावरून पत्रकाराची बदनामी करणे, जातीय शिवीगाळ, खंडणी उकळण्याचा प्रयत्न आणि धमकावणे अमोल प्रभाकर पालकर याला चांगलेच भोवले आहे.
या प्रकरणी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे अमोल पालकरविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला आहे. पोलीस प्रशासन सध्या आरोपीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट आणि खंडणीचा आरोप
किनगाव जट्टू येथील पत्रकार समाधान तुकाराम मुळे यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, सीसीटीएनएस (CCTNS) पोर्टलवरील तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोपी अमोल पालकर याने मुळे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले. आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुळे यांच्या जातीचा स्पष्ट उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला. एवढेच नव्हे तर, "या चिलर वार्ताहराला कोणी घाबरत नाही" अशी हीन वक्तव्ये करत सोशल मीडिया व सार्वजनिक ठिकाणी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्थानिक नागरिक, सरपंच आणि पत्रकारांवर खोट्या तक्रारींचा दबाव आणून खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
पत्रकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल प्रभाकर पालकरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५६(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा - Atrocities Act) आणि पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी; पोलिसांकडून शोध सुरू
आरोपी अमोल पालकरची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिली असून, यापूर्वी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी बिबी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध जातीय शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवार घडणाऱ्या या गैरकृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नवीन गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलीस पथके त्याचा माग काढत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून, आरोपीला तातडीने बेड्या ठोकण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

0 Comments