दाभा ग्रामसभेत विकासकामांवर मंथन; तंटामुक्ती अध्यक्षपदावरून जोरदार ठिणगी; ग्रामस्थांच्या विरोधामुळे निवड बारगळली!

दाभा (गावकरी टाइम्स/किशोर मोरे):
दाभा ग्रामपंचायत कार्यालयात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सरपंच डॉ. मारोती मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. ग्रामपंचायतीचे संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने प्रत्यक्ष कामकाजाचे वाचन आणि मांडणी स्वतः सरपंचांनी केली, तर ग्रामसभेचे प्रोसिडिंग लिहिण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे यांनी पार पाडली.


ग्रामसभेत प्रामुख्याने गावातील विकासकामे, कर वसुली आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:

आवास योजना व विकास आराखडा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण - टप्पा २) अंतर्गत 'आवास प्लस २०२४' ची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्यावर चर्चा झाली. तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून मंजुरी देण्यावर विचारविनिमय झाला.
कर वसुली व अतिक्रमण: गावातील अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांवर उपाययोजना करण्याचे ठरले. तसेच ग्रामपंचायतीचा थकीत कर वेळेत भरण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बालविवाह प्रतिबंध: बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत गावात जनजागृती मोहीम राबवून असा गैरप्रकार रोखण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड लांबणीवर

महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी रतन शिंदे आणि प्रभू श्रीराम घुगे यांची नावे सुचवण्यात आली. मात्र, उपस्थित ग्रामस्थांमधून या नावांना विरोध झाल्याने अखेर ही निवड अंतिम होऊ शकली नाही. पुढील बैठकीत यावर काय निर्णय होतो, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

या सभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय मोरे, माजी सरपंच पांडुरंग मोरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे, दत्ता घुगे, रामदास अजगर, मोतीराम मोरे, विनोद बाजड, मालतीताई कांबळे यांच्यासह डॉ. राजेश मोरे, ज्ञानबा मोरे, संतोष अजगर, कृषी सहाय्यक सास्ते, आरोग्य विभागाचे डॉ. जावेद शेख, आरोग्य सेवक चिरमाडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments