फिल्मी स्टाईल चेस! ३-४ किमी पाठलाग करून लोणार पोलिसांनी शेतात दुचाकी चोराला लोळवले; ५ मोटारसायकलींसह २० वर्षीय आरोपी गजाआड

लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण):
परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर लोणार पोलिसांनी जोरदार कारवाई करत एका अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने तब्बल ३ ते ४ किलोमीटर थरारक पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या एकूण ५ मोटारसायकली (अंदाजे किंमत १ लाख ५३ हजार रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत.


नेमकी घटना काय?

फिर्यादी प्रकाश किसन सरकटे (वय ४५ वर्षे, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांनी देऊळगाव कुंडपाळ शिवारातील शेतात ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता आपली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक MH-28-BS-5671) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात अप. क्र. ३५६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीने उघड केला मार्ग

गुन्हा दाखल होताच लोणार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास पथकाने लोणार ते मंठा रोडवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून पडताळणी केली. त्यामध्ये लोणार ते तडवळी रोडवरील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत एक संशयित इसम चोरीची मोटारसायकल घेऊन जाताना स्पष्टपणे कैद झाला.

थरारक पाठलाग: शेतात पळणाऱ्या चोराला घेरले

पोलिसांचे पथक संशयिताचा माग काढत परिसरात शोध घेत असताना, तो मंठा ते उसरड रोडने जाताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने थेट शेताच्या दिशेने पळ काढला. मात्र, दबा धरून न बसता पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने भर शेतात त्याचा तब्बल ३ ते ४ किलोमीटर पाठलाग केला. मंठा तालुक्यातील मुरूमखेडा गावाच्या शिवारात शिताफीने त्याला घेरून जेरबंद करण्यात आले.

आरोपीची माहिती व कबुली

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव अर्जुन बबन राठोड (वय २० वर्षे, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्याव्यतिरिक्त लोणार पोलीस ठाणे हद्दीतील इतर गुन्ह्यांतील (अप. क्र. ३४६/२०२६, ३४७/२०२६, ३५२/२०२६ अन्वये कलम ३०३(२) भा.न्या.सं.) दुचाकींची चोरी केल्याचीही कबुली दिली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹ १,५३,०००/-):
हिरो स्प्लेंडर प्लस: क्रमांक MH-28-BS-5671 (किंमत अंदाजे ₹ ५०,०००/-)
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस: विना क्रमांक, चेसिस क्र. MBLHA10EE91031591, इंजिन क्र. HA10E8910151337 (किंमत अंदाजे ₹ ४०,०००/-)
हिरो होंडा एच.एफ. डिलक्स: विना क्रमांक, चेसिस क्र. MBLHAR27JHG3696, इंजिन क्र. HE11ENJHG31712 (किंमत अंदाजे ₹ २८,०००/-)
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस: विना क्रमांक, चेसिस क्र. 06M16F32267, इंजिन क्र. 06M15E27421 (किंमत अंदाजे ₹ २०,०००/-)
बजाज सिटी १००: क्रमांक MH-20-AM-2967 (किंमत अंदाजे ₹ १५,०००/-)

तपास पथकाची धडक कामगिरी

सदर धडाकेबाज कामगिरी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) संतोष खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश सरगिरे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कोळासे, पोलीस हवालदार संजय जाधव, नितीन खराडे, अनिल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तायसकर, तेजराव भोकरे, गणेश नांदे, सुनिल गाडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल निता शिंदे यांनी पार पाडली. अवघ्या काही तासांत आरोपीला पकडून मुद्देमाल जप्त केल्याबद्दल लोणार पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments