परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडवून दहशत माजवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध किनगाव राजा पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील या तिन्ही सराईत चोरांना बुलडाणा, जालना, परभणी आणि वाशिम या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दत्ता प्रकाश विघरे (वय ३४), विलास भाऊलाल दुंडीयार (वय ३६) आणि मंगेश कुंडलिक अवचार (वय २२, सर्व रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चार जिल्ह्यांत दोन वर्षे प्रवेशबंदी
आरोपींविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यासह जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि संजय मातोंडकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५(१) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी २९ ऑगस्ट रोजी या प्रस्तावाला मंजुरी देत तिन्ही गुन्हेगारांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्यांना प्रत्यक्ष हद्दीबाहेर पाठवून आदेशाची अंमलबजावणी केली.
अवैध धंद्यांवरही पोलिसांची करडी नजर
गुन्हेगारांसोबतच किनगाव राजा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातही व्यापक मोहीम राबवली आहे. ऑगस्ट २०२५ च्या तुलनेत ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिसांनी धडक कारवाया करत अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे:
दारूबंदी कायदा: ९२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल (गतवर्षीपेक्षा २५ केसेस अधिक).
जुगार प्रतिबंधक कारवाई: २१ प्रकरणांमध्ये ठोस कारवाई (गतवर्षीपेक्षा १३ केसेस अधिक).
तंबाखूजन्य पदार्थ बंदी: ५४ गुन्हे दाखल.
प्रतिबंधात्मक कारवाई: BNSS कलम १२६ व १३५ अंतर्गत ४६५ जणांवर, कलम १२८ अंतर्गत ८, कलम १२९ अंतर्गत २५, तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ९३ अंतर्गत १२ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस अंमलदार विष्णू मुंढे, गणेश वारकरी, सुभाष गिते, संदीप डोंगरे, मिलिंद सोनपसारे, विजेता पवार आणि जीवन जायभाये यांनी मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा चाप बसला असून, किनगाव राजा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.

0 Comments