सुलतानपूरमध्ये सामाजिक सलोख्याचा आदर्श: सिद्धेश्वर कावड यात्रेचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत; चहा-फळवाटपाने जिंकली मने

सुलतानपूर (विशेष प्रतिनिधी):
पानकनेरगाव येथून सुलतानपूर शहराकडे परतणाऱ्या सिद्धेश्वर कावड यात्रेचे सुलतानपूर शिवारात आगमन होताच मुस्लिम बांधवांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. या उपक्रमातून गावातील हिंदू-मुस्लिम एकोपा, बंधुभाव आणि गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन संपूर्ण परिसराला घडले.


सिद्धेश्वर कावड यात्रा पानकनेरगाव येथून विधिवत पूजा-अर्चा आटोपून सुलतानपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. गावाच्या वेशीवर कावड यात्रा पोहोचताच स्थानिक मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शिवभक्तांचे टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत स्वागत केले. उन्हातान्हातून पायी प्रवास करून आलेल्या सर्व कावडधाऱ्यांसाठी जमीर साहेब व सहकाऱ्यांनी चहा आणि ताज्या फळांचे वाटप केले.

रुमाल व टोपी देऊन आयोजकांकडून मुस्लिम बांधवांचा सन्मान

मुस्लिम समाजाने दाखवलेल्या या प्रेमाचा आणि आदराचा सन्मान म्हणून सिद्धेश्वर कावड यात्रा समितीच्या वतीने जमीर साहेब यांच्यासह उपस्थित मुस्लिम बांधवांचा पारंपरिक रुमाल व टोपी घालून जाहीर सत्कार करण्यात आला. दोन्ही समाजाच्या या परस्पर आदर आणि स्नेहामुळे वातावरण भारावून गेले होते.

मान्यवरांची उपस्थिती

या सलोख्याच्या कार्यक्रमाचे नियोजन श्री. जमीर साहेब यांनी केले होते. या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये:
जमीर साहेब,गफार शहा,शेख खाजा शेख अख्तर,पत्रकार मोईन खान, सय्यद आरिफ,शेख अनवर,शेख रब्बानी
यांच्यासह गावातील दोन्ही समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

कावड यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी पोलिसांचेही आभार मानले.
जातीय सलोखा अधिक दृढ करणाऱ्या या हृदयस्पर्शी उपक्रमाचे सुलतानपूरसह संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments