येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील नालीचा प्रश्न आणि वॉर्ड क्रमांक ५ मधील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या रस्त्याची झालेली दुरवस्था तातडीने दूर करावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत या नागरी समस्या मार्गी न लागल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून टोकाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
तीन वर्षांपासून नाली तुंबलेली, आरोग्याचा प्रश्न गंभीर
तक्रारदार शिवप्रसाद किसन जोगदंड यांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार, त्यांच्या घरासमोरील नालीवर अतिक्रमण झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून घाण पाणी तुंबून राहत आहे. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून, त्यांच्या लहान मुला-मुलीला दोन वेळा डेंग्यूची लागण झाली. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करून आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी होऊनही प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
शाळकरी मुलींचे चिखलामुळे हाल
दुसऱ्या एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना निवेदनात नमूद केले आहे की, वॉर्ड क्रमांक ५ मधील जिल्हा परिषद कन्या शाळेकडे बसस्थानकावरून जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने विद्यार्थिनींना त्यातूनच कसरत करत जावे लागते. चिखलात घसरून काही विद्यार्थिनींचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
प्रशासनाला १२ सप्टेंबरपर्यंत मुदत
नालीचा निचरा आणि रस्त्याचा प्रश्न १२ सप्टेंबरपर्यंत निकाली न काढल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रसाद जोगदंड, सौ. संगीता जोगदंड आणि सुभाष खेत्रे यांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याकडे रीतसर पोहोच असलेले निवेदन देण्यात आले आहे.

0 Comments