लोणार/गुंधा(गावकरी टाइम्स/किशोर मोरे):
"ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगादेखील जिद्द, मेहनत, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो," असा प्रेरणादायी कानमंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संतोष खाडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिला. गुंधा येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान डीवायएसपी खाडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आपल्या जीवनप्रवासातील विविध अनुभव मांडले. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत कसा पल्ला गाठला, याचा रंजक प्रवास त्यांनी उलगडला.
अपयशाने खचून न जाता ध्येयावर लक्ष केंद्रित करा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी येतात; मात्र परिस्थितीला दोष न देता ध्येय निश्चित करून सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत वेळेचे नियोजन, शिस्त, आत्मविश्वास आणि संयम यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता चुकांमधून शिकून नव्या उमेदीने पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. “आपल्या परिस्थितीपेक्षा आपले ध्येय मोठे असले पाहिजे; आजची मेहनतच उद्याच्या यशाचा पाया ठरते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा
पालकांना संबोधित करताना ते म्हणाले की, मुलांची इतरांशी तुलना न करता त्यांच्या आवडी, क्षमता आणि ध्येय समजून घ्या. त्यांच्यावर विश्वास दाखवून घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी पालकांची आहे.
सत्कार समारंभ व मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्यात नुकतीच मंडळाधिकारी पदी पदोन्नती मिळालेले गोपाल कुटे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झालेले जगदीश येऊल यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, पुरुषोत्तम केंद्रे, जयदेवराव येऊल, भगवान सुलताने, कारभारी सानप, राजू तांबिले, शेख सर, विठ्ठलराव गिलवलकर, पुरुषोत्तम येऊल, माऊली जायभाये, ज्ञानेश्वर साखरे, विठ्ठल साखरे, सुभाष धावडे, प्रताप देशमुख, विजय डोईफोडे, रहीम शेख, शंकर मानवतकर, बबन खडसे, अंकुश नागरे, विशाल थोरवे, अंकुश गाडे, गजानन गोरे, भुजंग ढेपे यांच्यासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शनामुळे "ग्रामीण भागातूनही अधिकारी घडू शकतो" हा नवा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

0 Comments