लोणार नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या; विकासकामे रखडल्याने नगरसेवक अनिकेत मापारी यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण):
जागतिक वारसा लाभलेल्या लोणार शहराचा नियोजित विकास आणि प्रशासकीय शिस्त कायम राखण्यासाठी लोणार नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी व पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सध्या लोणार नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने या पदाचा अतिरिक्त भार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. परिणामी शहरातील मूलभूत नागरी सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विकासकामांचे नियोजन, निधीचा योग्य विनियोग आणि कामांचा आढावा घेण्यावर मर्यादा येत आहेत.
पर्यटन आणि नागरी विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज
लोणार सरोवरामुळे हे शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. येथे पर्यटकांसाठी रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनाची कामे वेगाने मार्गी लावणे आवश्यक आहे. शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग कायम राहावा आणि ती विहित मुदतीत पूर्ण व्हावीत यासाठी नगरपरिषदेला पूर्णवेळ प्रशासकीय प्रमुखाची नितांत आवश्यकता असल्याचे अनिकेत मापारी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती
प्रशासकीय कामकाजातील अडचणी दूर करून लोणार शहराचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक, अमरावती विभागीय आयुक्त आणि बुलढाणा जिल्हाधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments