आता चर्चा नको, थेट कृती हवी! कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी भक्तांचा आक्रोश; लोणारमध्ये तातडीची बैठक



लोणार : (गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी)
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेला परिसर जलमय झाला असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन श्री कमळजा माता मंदिर थेट पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. सद्यस्थितीत पाणी थेट मूर्तीच्या मुखापर्यंत पोहोचल्याने भाविकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "आता पोकळ आश्वासने आणि बैठका नकोत, प्रत्यक्ष काम सुरू करून मंदिर पाण्याबाहेर काढा," असा आक्रमक पवित्रा घेत भाविकांनी तहसीलदार भूषण पाटील यांना निवेदन दिले. या जनक्षोभाची दखल घेत उपविभागीय अधिकारी (मेहकर) यांच्या अध्यक्षतेखाली २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता लोणार तहसील कार्यालयात तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.


तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो' प्रस्ताव लालफितीत?

सरोवराची वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. नगरपरिषद, पुरातत्त्व विभाग आणि वन्यजीव विभागाशी चर्चा करून सरोवरातील अतिरिक्त गोडे पाणी उपसा (Lift) करून बाहेर काढण्याचा तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, अत्यंत खेदजनक बाब म्हणजे:
हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाकडून मंजूर होऊन केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे (NBWL) जाणे बंधनकारक होते.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाचा प्रस्ताव अद्यापही राज्य शासनाच्या स्तरावरच प्रलंबित आहे.
जोपर्यंत केंद्राची अंतिम मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत पाणी उपसणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही; परिणामी प्रशासकीय दिरंगाईचा फटका थेट मंदिराला बसत आहे.

२१ सप्टेंबरची बैठक ठरणार निर्णायक

तहसीलदार भूषण पाटील यांनी १६ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून भारतीय पुरातत्त्व विभाग (ASI), लोणार वन्यजीव विभाग, लोणार नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाला या बैठकीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष तांत्रिक व कायदेशीर कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी भक्तमंडळाने लावून धरली आहे.

पर्यावरण आणि वन्यजीवांनाही मोठा धोका

सरोवराची पातळी वाढल्याने केवळ मंदिराचेच नुकसान होत नसून संपूर्ण परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे:
वन्यजीवांचे स्थलांतर: किनारी भाग पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हे, तडस, साळींदर व बिबटे यांसारखे प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.
अल्कधर्मीय रचनेवर आघात: गोड्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने सरोवराचा ऐतिहासिक 'पीएच' (pH) स्तर आणि क्षारांचे वैशिष्ट्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

नवरात्राच्या तोंडावर भक्तांच्या संयमाचा अंत

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक कुलदैवत कमळजा मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदा मात्र आईचे मंदिरच जलमय झाल्याने भक्तांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. न्यायालयीन पेच आणि परवानग्यांचे कारण पुढे न करता तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी; अन्यथा उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा लोणारवासीयांनी दिला आहे. आता २१ सप्टेंबरच्या बैठकीत प्रशासन ठोस तोडगा काढते की पुन्हा कागदी घोडे नाचवले जातात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments