"अहंकार सोडा अन् स्वकर्तृत्वाने मोठे व्हा!" – संजय रायमुलकरांच्या वाढदिवशी इंदुरीकर महाराजांचे तुफान प्रबोधन


दाभा(गावकरी टाइम्स/किशोर मोरे):
"माणूस केवळ पैशाने किंवा पदाने मोठा होत नाही, तर प्रारब्ध, प्रामाणिक प्रयत्न, आई-वडील आणि गुरूंचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतात, तोच आयुष्यात खरा मोठा होतो," असे रोखठोक विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले.


माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मेहकर येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. या वेळी संपूर्ण संकुल भाविक आणि नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.

अहंकार सोडून स्वकर्तृत्वाने मोठे व्हा!

आपल्या खुसखुशीत आणि प्रबोधनात्मक शैलीत मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले,
"माणसाने आयुष्यात कितीही यश, पद आणि प्रतिष्ठा मिळवली, तरी त्याचा अहंकार डोक्यात जाता कामा नये. दुसऱ्याला लहान दाखवून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वकर्तृत्व आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करा. ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी 'ज्ञानेश्वरी' लिहून जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला आणि स्वतःच्या भावाला गुरू मानले. हेच खरे थोरपण आहे!"
आजच्या काळात वाढणाऱ्या भौतिकवादावर बोट ठेवताना त्यांनी स्पष्ट केले की,
"आजची माणसे नात्यांपेक्षा पैशावर जास्त प्रेम करतात. पण हे लक्षात ठेवा—सोने जसे आपले सोन्याचेपण सोडत नाही, संत जसे संतत्व सोडत नाहीत आणि कापड जसे धाग्याला सोडत नाही; तसेच आई-वडिलांचे प्रेमही कधीच कमी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाच्या बळावरच रयतेचे स्वराज्य निर्माण केले, हा इतिहास आपण विसरता कामा नये."

दिग्गजांची उपस्थिती अन् इंदुरीकर महाराजांचा भव्य सत्कार

कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांनी इंदुरीकर महाराज यांचा पुष्पहार व विशेष भेटवस्तू देऊन भावुक सत्कार केला. इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील लोकोपयोगी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
मेहकर-लोणार तालुक्यात उत्साहाचे वातावरण
माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर आणि लोणार तालुक्यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

उपस्थित प्रमुख मान्यवर:

या सोहळ्याला राजश्रीताई जाधव, रंजनाताई रायमुलकर, शाल्मली रायमुलकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, शहर प्रमुख जयचंद बाठिया, पांडुरंग सरकटे, युवासेनेचे नीरज रायमुलकर, भूषण घोडे, संदीप आल्हाट, नंदू बंगाळे, समाधान साबळे, प्रल्हाद सुलताने, धनंजय गायकवाड, नगरसेवक ओम सौभागे, मनोज जाधव, विशाल काबरा, अक्काताई गायकवाड, मोहन जाधव, दीपिकाताई रहाटे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments