धक्कादायक! विनाक्रमांक टिप्परने तहसीलदारांच्या गाडीला दिली जोरदार धडक; फिल्मी स्टाईलने ब्रिझा आडवी लावून वाळूचा टिप्पर पळवला!


अंढेरा / देऊळगाव राजा (बुलढाणा):
स्वातंत्र्यदिनीच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून गौरव झालेल्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यावर अवैध रेतीमाफियांनी जीवघेणा हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंढेरा फाट्यावर बेधडकपणे धावणाऱ्या विनाक्रमांक टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला जोरदार धडक देऊन त्यांना पथकासह चिरडण्याचा थरारक प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण महसूल व पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.


कारवाईदरम्यान थरार; ब्रिझा आडवी लावून टिप्पर पळवला

प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या आपल्या पथकासह १९ ऑगस्ट रोजी सकाळी अंढेरा फाटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत होत्या. यावेळी सुमारे ८० हजार रुपये किमतीची ४ ब्रास अवैध वाळू भरून चाललेला विनाक्रमांक टिप्पर त्यांनी अडवला. पथक कारवाई करत असतानाच, चालकाने शासकीय कामात अडथळा आणत थेट पथकाच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना जिवे मारण्याचा कट रचला. तेवढ्यात एका खाजगी ब्रिझा कारने मध्यस्थी करत तहसीलदारांचे वाहन अडवले आणि संधी साधून वाळूने भरलेला टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेण्यात आला.

गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू

या गंभीर प्रकरणी एकलारा (ता. चिखली) येथील हर्षल मनोहर अंभोरे आणि एका अज्ञात साथीदाराविरोधात अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सहायक पोलीस निरीक्षक सविता कुवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा आणि फरार टिप्परचा कसून शोध घेतला जात आहे.

एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यावर दिवसाढवळ्या झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे जिल्ह्यातील रेतीमाफियांची गुंडगिरी किती टोकाला पोहोचली आहे, असा संतापजनक सवाल आता उपस्थित केला जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments