जैन संप्रदायाचे परम श्रद्धास्थान परम पूज्य प्रभाकंवरजी महाराज (म.सा.) यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला प.पू. किरणसुधाजी म.सा., प.पू. विशालप्रभाजी म.सा., प.पू. श्री सुयशप्रज्ञाजी म.सा. आणि प.पू. सौम्यप्रज्ञाजी म.सा. यांची पावन उपस्थिती लाभली.
शहरातून निघाला भव्य 'वरघोडा'
महोत्सवानिमित्त 'धीरज भवन' येथून मंगलमय वातावरणात भव्य 'वरघोडा' (रॅली) काढण्यात आला. हा वरघोडा गेलडा भवन, प्रताप चौक, डोंगरवाल चौक आणि बस स्टँड चौक मार्गे मार्गक्रमण करत 'श्री मंगल कार्यालय' येथे पोहोचला. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी व नागरिकांनी वरघोड्याचे आणि साध्वीजींचे उत्साहात स्वागत केले. रॅलीच्या समारोपानंतर मंगल कार्यालयात धर्मसभा, गुणगौरव सभा आणि स्वामीवात्सल्य (महाप्रसाद) पार पडले. या सोहळ्यास बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशभाऊ मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, नगराध्यक्ष सौ. मीराताई भूषण मापारी, नगरसेवक भूषण मापारी, काँग्रेस नेते नितीन शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मापारी आणि पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
टपाल तिकिटासाठी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विशेष पोस्टल तिकीट (टपाल तिकीट) जारी करावे, अशी मागणी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले निवेदन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना सुपूर्द करण्यात आले.
१६ तपस्वींची अखंड आठ दिवसांची तपस्या
जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त समाजात तपश्चर्येला विशेष महत्त्व देत अबालवृद्धांनी कठोर साधना केली. यामध्ये सलग आठ दिवस अन्नत्याग करून उपवास करणाऱ्या १६ तपस्वी भाविकांमध्ये सौ. सुरेखा सुरेशचंद बेदमुथा, सौ. अनिता नवलचंदजी चोरडिया, सौ. सपना रौशनजी गेलडा, सौ. कोमल ऋषभजी गेलडा, सौ. आरती राजेशजी छाजेड, सौ. जया प्रवीणजी कोचेटा, कु. वीरती आशिषजी गुगलिया, सौ. मानसी ऋषभजी कोठारी, कु. पायल ललितजी लोढा, सौ. मानसी कोचेटा, श्री. ऋषभ पारसमलजी कोठारी, डॉ. सिद्धार्थ विजयजी बैदमुथा, श्री. जिनेन्द्र नवलचंदजी चोरडिया, श्री. सिद्धम रौशनजी गेलडा, श्री. गौरव संदीपजी कुचेरिया आणि श्री. आयुष शरदजी लुनिया यांचा समावेश आहे.
जिनेश्वर युवा ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
ज्ञान गंगोत्री प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिनेश्वर युवा ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिनेश्वर युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments