मध्यरात्री गोठ्यात रंगला होता जुगाराचा डाव; बिबी पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’, ९ जुगाऱ्यांना रंगेहात ठोकल्या बेड्या!


लोणार / बिबी(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
अवैध धंदे आणि जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध बिबी पोलिसांनी कडक भूमिका घेत मध्यरात्रीच्या सुमारास एका गोठ्यावर धाडसी छापा टाकला. चोरपांग्रा शिवारात शेतातील गोठ्याच्या आडोशाला पैशांच्या हार-जितीवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी ९ जुगाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.


'डायल ११२' वरील गुप्त माहितीवरून सापळा

दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री बिबी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना 'डायल ११२' वर चोरपांग्रा शिवारात जुगार सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले.

गोठ्याला चहूबाजूंनी घातला वेढा

पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रविराज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद थोरवे, चालक एएसआय (ब.नं. ६०६) आणि पंचांच्या पथकाने मध्यरात्री चोरपांग्रा शिवार गाठले. केशव डहाळके यांच्या शेतातील गोठ्याभोवती पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने वेढा टाकला. तिथे लाईटच्या प्रकाशात पैशांवर तिरट (जुगार) खेळत असलेल्या जुगाऱ्यांना पळून जाण्याची संधीही पोलिसांनी दिली नाही.

९ आरोपी ताब्यात; मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून अशोक नाथा जायभाये (वय ४२), भीमराव लक्ष्मण इंगळे (वय ३५), केशव एकनाथ डहाळके (वय ३२), दत्तात्रय परसराम खंड (वय २४), राजेश किसन बनसोडे (वय ३४), राजू नाथा जायभाये (वय ३४), विनोद प्रल्हाद खंड (वय ३२), गजानन ज्ञानदेव इंगळे (वय ४९) आणि गणेश विष्णू खंड (वय ४०, सर्व रा. चोरपांग्रा, ता. लोणार) यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत ५२ ताश पत्ते, डावावरील व अंगझडतीतील रोख रक्कम असा एकूण २,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद थोरवे यांच्या फिर्यादीवरून बिबी पोलीस ठाण्यात अप. क्र. १९८/२०२६ नुसार जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना नियमानुसार नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार रेणुका पडघान (ब.नं. १९४६) करत आहेत. मध्यरात्री धाडस दाखवून कारवाई करणाऱ्या बिबी पोलीस पथकाचे परिसरात कौतुक होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments