सुलतानपूर ग्रामसभेचा ठराव धाब्यावर बसवून नागरिकांना धमकावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सुलतानपूरसह लोणार तालुका व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्राहकांवर सुरू असलेली स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी; अन्यथा महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे 'जोडे मारो' जनआंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री तसेच महावितरण व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नयेत, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. असे असतानाही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लोकभावना आणि ग्रामसभेचा ठराव पायदळी तुडवत आहेत. नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन, दहशतीचे वातावरण निर्माण करून बळजबरीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाने आणि महावितरण प्रशासनाने या मनमानी कारभाराला तातडीने चाप न लावल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी (महावितरण), जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार लोणार आणि पोलीस निरीक्षक मेहकर यांनाही पाठवण्यात आली आहे.
प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती
निवेदन सादर करतेवेळी रि. सेना युवा जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांच्यासह अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्णा सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह परिसरातील शेकडो संतप्त नागरिक उपस्थित होते.

0 Comments