लोणार नगर परिषदेचा अजब कारभार; आधी घरकुलांचे हप्ते वाटले, आता ‘१०० मीटर’चा कायदा दाखवून गरिबांना नडले!

युवासेना तालुकाध्यक्षांचा १५ ऑगस्टला नगर परिषद प्रांगणात आत्मदहनाचा इशारा; थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण) :
लोणार नगर परिषदेच्या ढिसाळ आणि अजब कारभारामुळे पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेच्या गरीब लाभार्थ्यांवर ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पुरातन वास्तूच्या १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्राचे कारण पुढे करत प्रशासनाने लाभार्थ्यांचे पुढील हप्ते रोखल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या बेजबाबदार कारभाराविरोधात युवासेना तालुका प्रमुख गजानन विश्वंभर मापारी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून, न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी नगर परिषद प्रांगणात 'आत्मदहन' करण्याचा इशारा दिला आहे.


नेमका प्रकार काय?

लोणार नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला जागेची पाहणी करून आणि कागदपत्रांची पडताळणी करून रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्जांना मंजुरी दिली. पहिल्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर गरीब नागरिकांनी विश्वासाने आपली जुनी घरे/झोपड्या तोडून नवीन बांधकामासाठी वाळू, विटा व साहित्य खरेदी केले.
मात्र, घरे अर्धवट अवस्थेत असतानाच अचानक प्रशासनाला संरक्षित स्मारकाच्या '१०० मीटर' नियमाची आठवण झाली! आता हाच कायदा दाखवून नगर परिषदेने लाभार्थ्यांचे पुढील हप्ते देणे थांबवले आहे, तर "पहिला हप्ता चुकून दिला गेला" अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देत आहेत. नगर परिषदेच्या या चुकीची व निष्काळजीपणाची शिक्षा गरीब लाभार्थ्यांना का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

प्रमुख मागण्या:

युवासेना तालुका प्रमुख गजानन मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
अडकलेले हप्ते त्वरित द्या: मानवी दृष्टिकोनातून विचार करून रमाई घरकुल योजनेच्या १०० मीटर परिघातील लाभार्थ्यांचे अडकलेले पुढील हप्ते तात्काळ वितरित करावेत.
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी: केवळ तांत्रिक दाखला न देता गरजू नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ पूर्ववत मंजूर करावा.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व वसुली: योग्य पडताळणी न करता हप्ते वाटप करून गरिबांना बेघर करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून त्यांच्या पगारातून रिकव्हरी (वसुली) करण्यात यावी.

आत्मदहनाचा थेट इशारा!

"प्रशासनाने वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून घरकुलांचे अडकलेले प्रश्न तातडीने न सोडवल्यास, मी दिनांक १५/०८/२०२६ रोजी नगर परिषद लोणार यांच्या प्रांगणात आत्मदहन करेन," असा गंभीर इशारा गजानन मापारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या इशाऱ्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments