वाढदिवस म्हटला की डीजेचा गजर, फुलांचे हार आणि केक कापून जल्लोष करण्याची स्पर्धा सध्या समाजात पाहायला मिळते. मात्र, बुलढाणा विभागातील मेहकर आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले आणि 'सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना' (महाराष्ट्र राज्य) चे बुलढाणा विभागीय कार्याध्यक्ष सत्यनारायण परमेश्वर तेजनकर उर्फ सतीश पाटील तेजनकर यांनी आपल्या ४० व्या वाढदिवशी एक अनोखा आणि धडाकेबाज निर्धार केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी स्वतःच्या वाढदिवशी, म्हणजेच १८ ऑगस्ट २०२६ रोजी, मेहकर आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर ते आमरन अन्नत्याग आंदोलन (उपोषण) करणार आहेत. वाढदिवस साजरा न करता कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी थेट प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारल्यामुळे संपूर्ण बुलढाणा विभागातील कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
प्रशासनाला ३ ऑगस्टलाच दिली आंदोलनाची नोटीस
सतीश पाटील तेजनकर यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजीच मेहकर आगाराच्या आगार व्यवस्थापकांना उपोषणाची नोटीस सुपूर्द केली आहे. १७ ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास, १८ ऑगस्टला वाढदिवसाच्याच दिवशी कार्यालयासमोर सर्व पदाधिकारी व सभासदांसह अन्नत्याग आंदोलन सुरु करण्याचा इशारा दिल्याने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
सेवा ज्येष्ठतेचा नियम: मेहकर आगारात चालक-वाहकांचा इतरत्र होणारा वापर एसटी महामंडळाच्या नियमानुसार निव्वळ 'सेवा ज्येष्ठतेनुसार'च व्हावा.
नियमित कामगिरी: चालक जी. के. कुमरे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार दररोज डिझेल पंपावर कामगिरी देण्यात यावी.
मोबदला व साप्ताहिक सुट्टी: पंढरपूर यात्रेदरम्यान अतिरिक्त सेवा दिलेल्या चालक-वाहकांना नियमानुसार रद्द झालेली साप्ताहिक सुट्टी व इतर सर्व आर्थिक मोबदला तात्काळ मिळावा.
रात्रराणी ड्युटीवर दोन चालक: मेहकर ते त्र्यंबकेश्वर या रात्रराणी ड्युटीवर सुरक्षेच्या कारणास्तव नियमानुसार दोन चालक देण्यात यावेत.
ओव्हर टाईमचा हक्क: 'सुपर सिक्स' आणि 'सुपर नाईट आऊट'च्या सर्व ड्युटींना महामंडळाच्या नियमानुसार मिळणारा संपूर्ण ओव्हर टाईम देण्यात यावा.
स्पेअर ड्युटी मिळणे: शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी किलोमीटर रद्द झाल्यामुळे ड्युटी नसलेल्या चालक-वाहकांना 'स्पेअर' म्हणून कामगिरी देण्यात यावी.
प्रशासन 'गिफ्ट' देणार की उपोषणाला बसवणार?
एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपल्या वाढदिवशी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या या कणखर नेत्याच्या मागण्या प्रशासन मान्य करून त्यांना वाढदिवसाचे 'गिफ्ट' देणार, की वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना उपोषणाला बसवणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

0 Comments