धक्कादायक! पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीचा निधी उचलला?पोलिसांत तक्रार दाखल!


देऊळगाव राजा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चात गंभीर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा वापर करून ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर निधी उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


नेमका प्रकार काय?

ग्रामपंचायत शिवनी आरमाळचे ग्रामविकास अधिकारी अशोक रामेश्वर जायभाये यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की:
निधीची परस्पर उचल: १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बँक ऑफ इंडिया, देऊळगाव राजा शाखेतील ग्रामपंचायतीच्या खात्यातून धनादेश (चेक) क्रमांक १४६६१० द्वारे २७,२७५ रुपये काढण्यात आले.
स्वाक्षरीचा गैरवापर: ही रक्कम स्वतः ग्रामविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांनी पदभार सोडलेला असतानाही त्यांच्या स्वाक्षरीचा वापर करून काढण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी व सरपंचांवर संशय

या आर्थिक गैरव्यवहारामध्ये गटविकास अधिकारी मुकेश सुरत माहोर, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तसेच शिवनी आरमाळच्या सरपंच यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीनुसार, यापूर्वी सदर ग्रामपंचायतीचे बँक खाते 'होल्ड' (स्थगित) करण्यात आले होते. मात्र, गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी त्या खात्यावरील निर्बंध हटवण्याचे आदेश दिले. खाते होल्ड असताना निर्बंध हटवण्याचा निर्णय कोणत्या प्रशासकीय कारणास्तव घेण्यात आला आणि यात कोणते आर्थिक हितसंबंध होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

निष्पक्ष चौकशी आणि कारवाईची मागणी

दीड वर्षांपूर्वी पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी वापरून निधी कसा उचलला गेला? या व्यवहाराची सत्यता, संबंधित कागदपत्रे, धनादेशावरील स्वाक्षऱ्या आणि प्रशासकीय आदेशांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्व घटकांवर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments