बुलढाणा हादरला!दरोडेखोरांचा धुमाकूळ, विरोध करणाऱ्या शेतकऱ्याची निघृण हत्या; ४ ते ५ आरोपी पसार


मलकापूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी भीषण धुमाकूळ घालत एका ५२ वर्षीय शेतकऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरोड्याचा प्रतिकार करत चोरांचा पाठलाग करणाऱ्या रायसिंग सिताराम सोळंकी (वय ५२) या शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.


नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २:३० वाजेच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी काटी गावात प्रवेश केला. चोरांनी गावातील ३ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि चोरी केली. यामध्ये:
बाळू हरिश्चंद्र घेंगे यांच्या घरातून सोन्याचे मौल्यवान दागिने लांबवले.
संजय रामभाऊ हिवाळे यांच्या दुकानातून साड्या आणि मोठी रोकड पळवली.
गणेश मानसिंग राठोड यांच्या घरीही घरफोडी करण्यात आली.
या चोरीची चाहूल लागताच शेती आणि दुग्धव्यवसाय करणारे रायसिंग सोळंकी यांनी धाडस दाखवून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत एका दरोडेखोराने पाठीमागून काठीने त्यांच्यावर जोरदार वार केला. सोळंकी खाली कोसळताच इतर आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
सोळंकी यांच्या आरडाओरड ऐकून ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावले, मात्र गावकऱ्यांना येताना पाहून सर्व दरोडेखोर आधीच तयार ठेवलेल्या सायकली/मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोळंकी यांना गावकऱ्यांनी तातडीने शासकीय दवाखाना, मलकापूर येथे दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
घटनेची बातमी मिळताच पोलीस पाटील सुनील रतनसिंग चव्हाण यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

सध्या ठसे तज्ज्ञ घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून चोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments