पत्रकार रमेश चव्हाण यांना धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; 'लोकशक्ती'चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बुलढाणा(गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
जनहिताचे वृत्त प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पत्रकार रमेश चव्हाण यांना कथितरीत्या शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांवर निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकाराला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी ‘लोकशक्ती पत्रकार संघटना महाराष्ट्र’च्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात नमूद केल्यानुसार, दैनिक 'खोज मास्टर'चे मुख्य संपादक तथा पत्रकार रमेश चव्हाण हे सामाजिक समस्या, प्रशासकीय त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर सातत्याने वृत्तांकन करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ शुल्काबाबत आणि त्यामुळे सर्वसामान्य पालकांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताच्या रागातून रिफ्लेक्शन कोचिंग क्लासेसचे संचालक भगवान तांगडे व त्यांच्यासोबत आलेल्या इतर पाच ते सात व्यक्तींनी पत्रकार चव्हाण यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत अश्लील शिवीगाळ, दहशत निर्माण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लोकशाही आणि पत्रकार सुरक्षेचा प्रश्न
जनहिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या घरापर्यंत जाऊन धमकावणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची कोणत्याही राजकीय वा सामाजिक दबावाशिवाय सखोल आणि वस्तुनिष्ठ चौकशी व्हावी, तसेच संबंधित दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पत्रकार रमेश चव्हाण यांना आवश्यक ते संरक्षण पुरवण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश गायकवाड, प्रदेश सदस्य शाहीद शाह, असलम शाह, अकील शाह, सोमनाथ सावळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments