कै. कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा


लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान पठाण)
:येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कै. कमलबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क. बनमेरू यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
खेळ हे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी माध्यम : प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "खेळ हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून जीवन जगण्याची कला आहे. शिस्त, चिकाटी, परिश्रम आणि संघभावना ही खरी मूल्ये खेळातूनच अंगी बाणवता येतात. जिंकणे-हारणे क्षणिक असले तरी खेळातून मिळालेली शिकवण आयुष्यभर पुरते. तरुणांनी मैदानी खेळ व नियमित सरावावर भर दिल्यास मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे देशासाठी सुवर्णपदके जिंकणे शक्य आहे. तसेच आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात क्रीडा क्षेत्रातील सामान्य ज्ञानही अत्यंत उपयुक्त ठरते."

खेळाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी : डॉ. संतोष बनमेरू

उद्घाटक डॉ. संतोष बनमेरू यांनी खेळाडूंना नियमित सरावाचा सल्ला दिला. सातत्यपूर्ण सरावाने क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवता येतात आणि खेळाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उत्तम नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. मंगेश ठोंबळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सौरभ गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments